माजरी स्मशानभूमीची दुरावस्था

39

वेकोलीच्या मुख्यमहाप्रबंधक यांना निवेदन

माजरी : येथील स्मशानभूमीतील शेडची दुरावस्था झाली असून ही शेड पूर्णपणे मोडकळीस आली आहे. शेडचे छप्पर जीर्ण झाली असून, याकडे सामुदायिक उत्तरदायित्व म्हणून वेकोलि प्रशासनाने लक्ष देवून स्मशानभूमीत उद्भवलेल्या सर्व समस्या दूर करावी, अशी मागणी भाजपचे माजरी क्षेत्राचे अध्यक्ष एम. पी. राव यांनी शनिवारी वेकोलिला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

.     माजरी येथील लोकसंख्या २० हजारांपेक्षा जास्त आहे. येथे शिरणा नदीच्या शेजारी स्मशानभूमी आहे. सर्वात जास्त अंत्यविधी याच ठिकाणी होतात. दरम्यान चर्चपासून ते स्मशानभूमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ -मोठे झाडे वाढलेले आहेत. या स्मशानभूमीच्या आतमध्ये सुद्धा घाणीचे साम्राज्य आहे. येथे शेजारीच शिरणा नदी आहे. अंत्यविधीनंतर हिंदू धर्मातील चालीरितीप्रमाणे अग्नि देणाऱ्यास अंघोळीसाठी आणि मडके खांद्यावर घेण्यासाठीही पाणी घरून आणावे लागते. दरम्यान पाणीत जाण्यासाठी नदीवर घाट सुद्धा बांधण्यात आलेला नाही.

.     रात्रीच्या वेळी या भागात लाईटचा प्रकाशही नसतो. नागरिकांना त्याठिकाणी लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. येथे नियमित स्वच्छताही ठेवली जात नाही. यामुळे अनेकांची कुचंबणा होते. तरी या प्रश्नाकडे वेकोलि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती व त्याठिकाणी लाईट लावून शुशोभीकरण करावे अशी मागणी भाजपचे माजरी क्षेत्राचे अध्यक्ष एम. पी. राव यांनी वेकोलिच्या मुख्यमहाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.