विजासन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा

30

सुनील बिपटे यांची मागणी

काम रखडल्यामुळे नागरिक त्रस्त

भद्रावती : कामाचे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर भद्रनाग मंदिर ते विजासन या सिमेंट रस्त्याचे काम ठेकेदारांकडून सुरू करण्यात आले. मात्र या रस्त्याचे बांधकाम अनेक कारणाने वादग्रस्त राहिले रस्त्याचे बांधकाम कसेबसे पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या पेवर ब्लॉकचे बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे .याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्याला येथील पत्रकार सुनील बिपटे यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधल्यानंतर या रस्त्याचे उर्वरित काम दोन दिवसात सुरू करण्यात येईल असे आश्वासन अभियंता कडून देण्यात आले आहे.

.       या सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता उंच झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉक लावण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र ते अर्धवट थांबविल्याने या रस्त्यावरून वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे. रस्ता उंच असल्यामुळे व अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक लावण्यात न आल्याने उंच रस्त्यावरून बाजूला गाडी घेता येत नाही असे केल्यास वाहनाला अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे. या अर्धवट रस्त्यामुळे या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात आतापर्यंत झालेले आहे व एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक बसविण्याचे काम का? बंद करण्यात आले हे एक कोडेच आहे.

.       सध्या शाळेला सुरुवात होत असून या रस्त्यावरून विद्यार्थी वेकोली कामगार व अन्य गावाला जाणारी नागरिक ये-जा करीत असल्याने या अर्धवट रस्त्याचा त्रास त्यांना होत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या पेवर ब्लॉकचे काम त्वरित पूर्ण करून हा रस्ता नागरिकांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विजासन परिसरातील नागरिकांतर्फे पत्रकार सुनील बिपटे यांनी केली आहे.