प्रदूषण करणाऱ्या अरबिंदो कंपनीवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

31

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचा निवेदनातून इशारा

भद्रावती : चंद्रपूर जिल्हा आधीच देशात प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखल्या जात आहे. त्यात भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रिअॅलिटी कंपनीच्या कोळसा खाणीतील कोळसा वाहतूक ही प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून केल्या जात असल्याने परिसरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा विपरीत परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

.      या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सदर कंपनीवर नियमानुसार कारवाई करा, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे.

.      सदर कंपनीची कोळसा वाहतूक ही एका कच्च्या रस्त्याने केल्या जाते नियमानुसार हा रस्ता पक्का असायला हवा. कच्च्या रस्त्यावरील कोळसा वाहतुकीमुळे परिसरात सर्वत्र प्रदूषण होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सदर कंपनी तर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे पर्यावरणाबाबत देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लेखन केल्या जात असल्यामुळे आधीच प्रदूषीत असलेल्या जिल्ह्यात प्रदूषणात सारखी वाढ होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर कंपनीवर कारवाई करावी, या प्रकाराची दखल घेऊन कारवाई न केल्यास राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी निवेदनातून दिला आहे.