पाईप लाईनच्या टाक्यात वृद्धाचा मृतदेह आढळला

40

चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्गांवरील घटना 

भंगार गोळा करून करत होता उदरनिर्वाह

विसापूर : एकेकाळी तो पेपर मिल मध्ये कामाला होता. मात्र नंतर त्याला दारूचे व्यसन लागले. दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो भंगार गोळा करत होता. हाच व्यवसाय त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. त्याच वृद्ध इसमाचा मृतदेह पाईप लाईनच्या छोटया टाक्यात आढळला. ही घटना शनिवार (दि. १५) रोजी सकाळी ८ वाजता चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्गांवरील भिवकुंड (विसापूर) जवळच्या पुलाजवळ घडली. मृतक वृद्धाचे मनोहर गावतुरे (६५) रा. गोकुळनगर वार्ड, बल्लारपूर असे नाव आहे.

.       मृतक मनोहर हा मागील काही दिवसापासून विसापूर परिसरात भंगार गोळा करत होता. भंगार विक्रीच्या व्यवसायातून तो दारू पिण्याची हौस पूर्ण करत होता. हाच धंदा त्याच्या दररोजच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरले होते. भंगार गोळा करून सायकलवर भली मोठी पिशवीच्या माध्यमातून बल्लारपूरला विक्रीसाठी नेत होता. विसापूर परिसर हेच त्याचे व्यवसाय करण्याचे क्षेत्र होते. अशातच मनोहर हा विसापूर फाट्याकडे गेला.

.       चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्गांवरील विसापूर फाट्याजवळ एक पूल आहे. त्या पुलाखालून नळ योजनेची पाईप लाईन गेली आहे. त्या ठिकाणी छोटे टाके आहे. त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी अथवा कपडे धुण्यासाठी मनोहर गेला असावा. तोल जाऊन तो त्या ठिकाणी पडला. निर्जन स्थळ असल्याने त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मात्र शनिवारी सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांना त्या छोट्या टाक्यात वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.

.       पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग दाखल करून वृद्धाचे शवविच्छेदनासाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पांडे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय, विशाल बेझलवार, हेमराज गुरुनुले करत आहे.