विसापूर ग्रामपंचायत मधील अविश्वास बारगळला

41

सरपंच व उपसरपंच आपल्या पदावर कायम 

अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणारे पलटले

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत मध्ये ७ जून रोजी तहसीलदार बल्लारपूर कडे १४ ग्रामपंचायत सदस्यांनी स्वाक्षरी करून सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचे विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. बुधवार दि. १२ रोजी सकाळी १२ वाजता विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली. या सभेत अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करणारे चार ग्रामपंचायत सदस्यांनी वेळेवर पलटी मारली. यामुळे सरपंच व उपसरपंच यांचेवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला.

.       बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या १७ आहे. दि. 12 ला अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सतीश साळवे, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, तलाठी अजय नोकरकार व ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी विशेष सभेला सुरुवात केली.
सभेच्या प्रारंभी सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या अविश्वास प्रस्तावावर मतदान हात उंचावून घेण्यात आले. यामध्ये अविश्वास नको म्हणून ७ ग्रामपंचायत सदस्यांनी बाजू घेतली. यामध्ये १0 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचे अनुमोदन करून मतदान केले. यावेळी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणारे गजानन पाटणकर, विद्या देवळकर, शशिकला जीवने व प्रदीप गेडाम यांनी पलटी मारून सरपंच वर्षा कुळमेथे यांना अविश्वासापासून वाचविले.

.       उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचेवरील अविश्वास प्रस्ताव दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सूरज टोमटे, दिलदार जयकर, सरपंच वर्षा कुळमेथे, विद्या देवळकर, शशिकला जीवने व गजानन पाटणकर यांनी ठराव पारित करण्याच्या बाजूने मतदान केले. तर उपसरपंचावरील अविश्वास ठराव पारित होऊ नये म्हणून शारदा डाहुले, रीना कांबळे, सुवर्णा कुसराम, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, संदीप काकडे, सरोज केकति, सुरेखा इटनकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम यांनी मतदान करून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना अविश्वास ठरावापासून वाचविले.

ठराव पारित करण्यासाठी १3 सदस्यांची होती गरज                                                                                                                                                                                                                            विसापूर ग्रामपंचायतीत एकूण १७ ग्रामपंचायत सदस्य आहेत.सरपंच व उपसरपंच यांचेवर अविश्वास प्रस्ताव दाखल करताना नियमानुसार १४ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार बल्लारपूर यांचे समक्ष स्वाक्षरी करून ७ रोजी अविश्वास ठराव दाखल केला. एक तृतिहांश एकूण १७ सदस्यांच्या तुलनेत १3 होते. मात्र अविश्वास ठरावावर स्वाक्षरी करून कोणाचा तरी आदेश आला, म्हणून प्रदीप गेडाम,गजानन पाटणकर,विद्या देवाळकर व शशिकला जीवने यांनी पलटी मारून सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचेवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यास मदत केली. परिणामी गावकऱ्यात ग्रामपंचायत सदस्यांची नौटंकी असल्याचा सूर उमटू लागला आहे. यामुळे अविश्वास प्रस्ताव दरम्यान सरपंच व उपसरपंच यांना पाय उतार करण्यासाठी १3 सदस्यांचे पाठबळ मिळाले नाही.