वासेरा येथील महेश बोरकर यांनी दिला सरपंच पदाचा राजीनामा

32

ग्राम पंचायत वर प्रशासक राज येणार

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा वासेरा ग्राम पंचायतचे सरपंच महेश बोरकर आणि उपसरपंच मंदा मुनघाटे या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने ग्राम पंचायत वर प्रशासक राज येणार असून पुढील सरपंच, उपसरपंच कोण असणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

.      वासेरा ही ११ सदस्य असलेली ग्राम पंचायत असून मागील जानेवारी २०२१ मध्ये या ग्राम पंचायत ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. भाजपा प्रणित आणि कांग्रेस प्रणित आघाडी यांचेमध्ये चुरशीची लढत झाली असून भाजपा प्रणित आघाडीचे ६ सदस्य विजयी झाल्याने त्यांना निर्विवाद बहुमत प्राप्त झाले. नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) याकरिता सरपंच पद राखीव असल्याने आणि आघाडीकडे सरपंच पदासाठी एकापेक्षा अनेक उमेदवार इच्छुक असल्याने तीन वर्ष आणि दोन वर्ष असा सरपंच उपसरपंच पदाचा फॉर्म्युला ठरवून महेश बोरकर यांना सरपंच पदी तर मंदा मुनघाटे यांना उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

.      नुकताच सरपंच आणि उपसरपंच यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने ठरविल्या प्रमाणे सरपंच महेश बोरकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देण्याचे कबूल केले. त्या पाठोपाठ उपसरपंच मंदा मुनघाटे यांना सुद्धा पदाचा राजीनामा देण्यास पक्षाकडून सांगण्यात आल्याने अखेर दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच या ग्राम पंचायत वर प्रशासकाची नेमणूक करून येणाऱ्या काही दिवसांत सरपंच, उपसरपंच पदाची निवड करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पंचायत समिती कार्यालय कडून देण्यात आली आहे.