विसापूरच्या सरपंच, उपसरपंचाच्या अविश्वास प्रस्तावावर १२ जूनला होणार निर्णय

32

तहसीलदारांनी बजावली सदस्यांना नोटीस

१४ ग्रामपंचायत सदस्य ठाम भूमिकेवर

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या विसापूर ग्रामपंचायत मधील १४ सदस्यांनी सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचेवर ७ जुन रोजी बल्लारपूर तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला. या अनुषंगाने तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांनी १२ जूनला दुपारी १२ वाजता ग्रामपचायत कार्यालय, विसापूर येथे विशेष सभा आयोजित केली आहे. या संदर्भात सदस्यांना नोटीस बजावण्यात आली असून अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरपंच व उपसरपंच यांना पाय उतार करण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

.        बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. यामध्ये विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी एकमेव ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ आहे. यातील १४ सदस्यांनी विसापूर ग्रामपंचातीच्या सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्यावर विविध कारणे दर्शवून ७ जुन रोजी तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांच्या समक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या १४ सदस्यांच्या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी केली होती. त्या नुसार तहसीलदारांनी अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात १२ जुन रोजी विशेष सभा बोलावली आहे.

.        विसापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक नंतर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर वर्षा कुळमेथे निवडून आल्या होत्या. त्यावेळी सुवर्णा कुसराम यांचा त्यांनी पराभव केला होता. उपसरपंच पदी अनेकश्वर मेश्राम निवडून आले होते. अडीच वर्षे त्यांनी गावाचा कारभार केला. मात्र गावाकऱ्यांचे व ग्रामपंचायत सदस्यांचे गाव विकासाबाबत सूर जुळून आले नाही. परिणामी ग्रामपंचायत सदस्यात असंतोष वाढला. याला ग्रामपंचायत मधील अंतर्गत खदखद देखील कारणीभूत ठरली आहे. यामुळे सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना अविश्वास ठरावाला समोरे जावे लागत आहे. अविश्वास ठराव पारित करण्यावर सदस्य ठाम असल्याचे दिसून येत आहे. १२ जूनला ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याबाबत काय निर्णय लागतो, याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.