विसापूर ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच्या वर अविश्वास प्रस्ताव दाखल

45

राजकीय वर्तुळात खळबळ

१४ ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी

विसापूर : बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून विसापूर ओळखली जाते. येथे १७ ग्रामपंचायत सदस्य संख्या असून राजकीय भूकंप झाला आहे. येथील सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांचेवर अविश्वास दर्शवून १४ ग्रामपंचायत सदस्यांनी शुक्रवार (दि. ७) रोजी बल्लारपूर येथील तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांचेकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे विसापूर ग्रामपंचायत राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या अविश्वास प्रस्तावावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे.

.         बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १७ हजारावर आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ असून मागील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत बहुपक्षीय सदस्य निवडून आले होते. अनुसूचित जमातीसाठी राखीव महिला सरपंच म्हणून वर्षा कुळमेथे व उपसरपंच पदावर अनेकश्वर मेश्राम यांची निवड करण्यात आली होती. मात्र येथील ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या धरसोड भूमिकेमुळे एक्कल्ली झाला. यामुळे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम हतबल झाले. परिणामी गावविकासात अडथळा निर्माण होऊ लागला. याप्रकाराने ग्रामपंचायत सदस्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली.

.         ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता गावाचा कारभार केला जात होता. यामुळे गावाकऱ्यात असंतोष निर्माण झाला. याला कंटाळून १४ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या सोबत उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना देखील अविश्वास प्रास्तवाला सामोरे जाण्याची पाळी आणली. येत्या सात दिवसात विसापूर गावात काय राजकीय घडामोडी होतात, याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे विसापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच व उपसरपंच यांचेवर एकाच वेळी अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.

विसापूर ग्रामपंचायतीचे १४ सदस्यांनी माझ्या समक्ष सरपंच व उपसरपंच यांचवरील अविश्वासाचा प्रस्ताव स्वाक्षरीसह सादर केला. त्या प्रस्तावानुसार दि. १४ जूनला विसापूर ग्रामपंचायत सदस्यांची विशेषसभा बोलावून अविश्वास ठरावावर निवडणूक घेऊन निर्णय घेण्यात येईल.                                                                                                                                                                                                                                                                        प्रियदर्शनी बोरकर,                                              तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बल्लारपूर