अवकाळी पाऊस व वादळाने पडलेले कृषी पंपाचे पोल व डिपीची तात्काळ दुरूस्ती करा

27

भाजपचे वीज वितरण कंपनीला निवेदन

भद्रावती : तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने व वादळाने कृषी पंपाचे पोल तुटून पडले. त्याची तत्काळ दुरुस्ती करून सतत होत असलेला विजेचा लपंडाव थांबवावा या आशयाचे निवेदन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांना देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.

.       भद्रावती तालुक्यात अनेक गांवात अवकाळी पावसामुळे व वादळाने गावातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे पोल तुटून पडले असून अनेक शेतातील डिपीसुद्धा खराब झालेल्या आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा पुर्णतः खंडीत झाला असल्याने शेती पंप विद्युत पुरवठ्यामुळे बंद पडलेले आहेत, तुटून पडलेले पोल व खराब झालेल्या डीपीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. नविन पेरणी हंगाम सुरू होणार असुन जगाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल पिकविण्याकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता भासणार आहे.

.       सदर पोल व डीपीची दुरुस्ती न झाल्यास तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहू शकतात. तसेच भद्रावती शहरात अनेक दिवसांपासुन विजेचा लपंडाव सुरु आहे. तापमानाचा पाऱ्याने उच्चांक गाठला असून वारंवार मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत होणे म्हणजे महावितरण विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उमटविणारे आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित समस्यांचे निराकरण करून जनतेला दिलासा देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. येत्या ८ दिवसात तोडगा न निघाल्यास जनतेच्या हितार्थ तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, त्यानंतर उदभवणा-या परिणामास व परिस्थितीस उप अभियंता व्यक्तिशः व आपले प्रशासन पुर्णतः जवाबदार राहील. असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

.       यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, जिल्हा सचिव भाजयुमो रुपेश मांढरे, प्रवीण सातपुते, शहरअध्यक्ष पप्पू शेख, किशोर गोवारदिपे, प्रीतम देवतळे, सुरज पेंदाम, विक्की सोनुने, श्याम मानकर, प्रवीण सिंग, उत्तम पोईनकर, सचिन नारायणे, प्रफुल भोस्कर आदी उपस्थित होते.