चेहरा बांधून कारने एकटा फिरणारा तो पोलीस कर्मचारी कोण ?

54

सेटिंगसाठी दिड तास रेतीचे वाहन रोखून धरले

पत्रकार पोहचताच त्या वाहनावर कारवाही

वरोरा : चंद्रपुर जिल्ह्यात रेतीचे घाट लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैद्य रेती तस्करांनी डोके वर काढले आहे. या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी चंद्रपूर एलसीबी, वरोरा महसूल विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रेती तस्करांवर कारवाई करीत आहे. मात्र वरोरा पोलिस स्टेशन चा एक पोलिस कर्मचारी अधिकार्‍यांना हुलकावणी देत  एका खाजगी कार मध्ये चेहर्‍याला रुमाल बांधून अवैद्य  रेती तस्करांवर नजर ठेवत सेटिंग मारत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा पोलीस कर्मचारी कोण याचा शोध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.

.       वरोरा तालुक्याला वर्धा नदीचे पात्र लागलेले आहे. या पात्रात विविध ठिकाणी रेतीघाट असून त्याचा लिलाव यावर्षी झालेला नाही. याचा गैरफायदा अनेक रेती तस्कर घेताना दिसत आहे. चंद्रपूर गुन्हा शाखेचे पथक, जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम स्वतः पुढाकार घेऊन तसेच महसूल विभागाचे पथक अशा रेती तस्करांवर कारवाई करीत आहे. यामुळे रेती तस्करीला काही अंशी लगाम लागली असली तरी अशा कारवायाला न जुमानता अनेक रेती तस्कर नदीपात्रातील रेती घाटातून तसेच वनविभागाच्या हद्दीतील नाल्यांमधून अवैध रित्या रेतीचा उपसा आणि वाहतूक करीत आहेत. एक पोलीस कर्मचारी कार मध्ये चेहर्‍याला रुमाल बांधून  एकट्याने फिरून अशा रेती तस्करांना हेरून तडजोड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वसुली करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

.       शहरातील एका भागात अलीकडे हा प्रकार घडला. हा पोलीस कर्मचारी एकटा कार मधून रेती तस्करांच्या मार्गावर फिरत होता.  एक टिप्पर पकडण्यात त्याला यश आले. रेती भरलेल्या टिप्पर दुपारी दीड वाजताच्या सुमारास पकडल्यानंतर वाहनचालक व मालक यांच्यासोबत सदर पोलीस कर्मचाऱ्याने सुमारे एक तास नऊ मिनिटे पर्यंत वाटाघाटी केल्या. तडजोडी अंती गाडी मालक मागितलेली रक्कम त्या पोलीस कर्मचाऱ्याला द्यायला तयार झाले. परंतु ही माहिती शहरातील काही पत्रकारांना मिळाली आणि पत्रकार तिथे पोहोचले. तेव्हा मात्र त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका बदलली आणि वरिष्ठांना फोन करून कर्मचारी बोलवून घेतले आणि दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाहन पोलीस ठाण्यामध्ये नेले. हा सर्व प्रकार सदर पोलीस कर्मचारी कार ने फिरलेल्या मार्गावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आहे.

.       सर्व प्रकार ज्या ठिकाणी रेती भरलेला टिप्पर पकडला त्या परिसरातील नागरिकांनीही आपल्या डोळ्यांनी बघितला. मागितलेली रक्कम गाडी मालकाने बँकेतून काढली तो देखील या संदर्भातील पुरावा आहे. दिवसभरात या पोलीस कर्मचाऱ्याने रेती भरलेली काही वाहने पकडून ती सोडली असल्याचे देखील बोलले जाते. जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, चंद्रपूर गुन्हा शाखा पथक असे एक ना अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी रेती तस्करांवर कारवाईसाठी जीवाचे रान करत असताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याकडून एकटे फिरून रेती तस्करांकडून वाटाघाटीच्या माध्यमातून वसुली करणे आणि रेतीची वाहने सोडणे अत्यंत संताप जनक आहे.

.       यामुळे सदर प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन तो पोलीस कर्मचारी कोण, अधिकारी किंवा इतर पोलीस कर्मचारी सोबत न घेता कार ने एकटे फिरून रेती तस्करी करणाऱ्यांना गाठण्याचे आणि वाटाघाटी करण्याचे कारण काय त्याची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे.