अवकाळी पावसाने आणले गरीबाच्या डोळ्यात पाणी

51

पंचनामे करून मदत जाहीर करा

अनेकांच्या घराची छते उडाली

अन्नधान्याची राखरांगोळी

माजरी : ७ मे ला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या गारपीटामुळे माजरीसह परिसरातील अनेकांचे दुकाने आणि घरांचे पत्रे उडून पडझड झाल्याची घटना घडली. तर यादरम्यान विज पुरवठाही खंडित झाला होता. यात सुदैवाने जीवित हानी टळली. यामध्ये अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे आता हातावर आणून पानावर खाणारे गोरगरीब नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांसमोर उभ्या राहिलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची गरज आहे.

.       मंगळवारी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान माजरी व आसपासच्या परिसरात वादळी वारा आणि गारपीटासह जोरदार पाऊस झाला. यात मोहबीया दफाई, दफाई नं. १, विनायक नगर, न्यू हाऊसिंग, तेलगू दफाई, सिद्धार्थ वार्ड, बांदा दफाई, शांती कॉलनी, एलसीएच कॉलनी, रेती दफाई, जि.प. हिंदी शाळेसह अनेक दुकाने आणि घरांचे संपूर्ण पत्रे वादळात उडून गेले होते. तसेच काही लोकांच्या घराच्या भिंतीही कोसळल्या. सुदैवाने घरातील मानसे प्रसंगावधान राखून घराबाहेर पळाल्याने जीवित हानी टळली.

.       दरम्यान घराचे पत्रे सुमारे शंभर ते दोनशे फूट अंतर येऊन पडले, तर अनेक झाडे उन्मळून अनेक घरावर पडले. यामध्ये अनेक दुकानदारांचे सामानाचा नुकसान झाले तर घराचे छत उडून आणि घरे क्षतीग्रस्त होवून अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुकानदारांनी कर्ज काढून उभारलेल्या दुकाने ही वादळामध्ये उडून गेले आहेत. मोठा खर्च करून दुकानामधील लावलेले साहित्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे़. दरम्यान घरांची झालेली पडझड, जि.प. हिंदी शाळेचे उडालेले पत्रे, दुकानदारांचे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ओळखून तातडीने नुकसानीबाबत प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी पीडितांनी केली आहे.

.       दरम्यान माजरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर व सरपंच छाया जंगम यांंनी घटनेची माहिती महसूल विभागास कळवली. आणि स्वतः प्रभावित क्षेत्राची पाहणी केली. दरम्यान भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या सूचनेनुसार तलाठी विलास शंभरकर यांच्या मार्गदर्शनात माजरीचे कोतवाल यांनी बुधवारी नुकसानग्रस्त घराचे पंचनामे केले. दरम्यान एकूण ५२ पंचनामे करण्यात आले असून, यामध्ये जि.प.हिंदी शाळा,४ दुकान आणि ४१ घरांचा समावेश आहे.

.       दरम्यान आशुतोष सपकाळ, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांनी बुधवारी आपल्या पथकासह जि.प. हिंदी शाळेत भेट देवून पाहणी केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे माजरी परिसरातील नागरिकांचे प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. शासनाकडून तात्काळ पंचनामा होऊन नागरिकांची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.