ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत “माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी” प्रशिक्षण

78

ब्रम्हपुरी: शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे नियोजन राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि तालुकास्तर असे करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी व अनुदानित शाळांतील शिक्षकांचे” शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण” पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांचे मार्गदर्शनात व नियोजनात दिनांक 11 ते 16 मार्च दरम्यान दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले.

.      प्रशिक्षणा दरम्यान इयत्ता बारावी व दहावी च्या बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे व त्यात अनेक शिक्षकांच्या केंद्र संचालक, मॉडरेटर, रनर तसेच पेपर तपासणीची कामे असल्यामुळे, शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आलेले होते.यामध्ये पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील खाजगी व अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ,वरील कामातून मुक्त असलेल्या 120 शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती.सदर शिक्षकांना दिनांक 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 130 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात आले व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

.      दिनांक 16 मार्च 2024 रोज शनिवारला प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे, मुख्याध्यापक संघ जिल्हा चंद्रपूरचे सचिव संजय हटवार, प्रमुख अतिथी म्हणून नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक रणदिवे, लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंगडे, सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चे मुख्याध्यापक नगराळे व महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव चे मुख्याध्यापक ओमप्रकाश बघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

.      दरम्यान दिनांक 11 ते 16 मार्च या कालावधीत चाललेल्या दोन्ही टप्प्यात विषय तज्ञ म्हणून भूमिका बजावलेल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ओमप्रकाश बघमारे, संजय हटवार, राजेंद्र हटवार, विजय धांडे, आशय पोफळी, प्रा. नाशिक गेडाम, विषय तज्ञ नरेश रामटेके, पद्माकर रामटेके यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर रामटेके यांनी तर आभार विषय तज्ञ नरेश रामटेके यांनी मानले.