जप्ती केलेला रेती साठा घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत

43

वरोरा तहसीलदारांनी काढला आदेश

केळी येथे 70 ब्रास रेती साठा जप्त

चंद्रपुर : जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नाही.  याचा फटका सर्वच निर्माधीन बांधकामांना बसला. यामुळे सर्वाधिक अडचणीत घरकुल लाभार्थी आले आहे. त्यामुळे वरोर्‍याचे तहसीलदार योगेश कौटकर यांनी केळी येथे जप्ती केलेला रेती साठा रेती अभावी घरकुलाचे काम सुरू न झालेल्या लाभार्थ्यांना देण्याचा आदेश काढला असून वरोरा तालुक्यातील 23 लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर रेती वाहून नेण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत झीरो रॉयल्टी पास दिल्या जाणार असून यासाठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले आहे.

.          वरोरा तालुक्यातील मौजा केळी येथे महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाच्या नावाने असलेल्या शेत जमीन सर्वे क्रमांक 177 आराजी 1.66 हे.आर. मध्ये अंदाजे 70 ब्रास रेती साठा असल्याची माहिती महसूल विभागाला मिळताच सदर रेती साठ्याची चौकशी करण्यात आली. मात्र हा साठा कुणाचा आहे हे कुणी सांगण्यास तयार नसल्याने पंचनामा करून महसूल विभागाने जप्तीची कारवाई  केली.

.          प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेच आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी जप्त केलेली रेती देण्याबाबतची तरतूद अव्वर सचिव महसूल व वनविभाग यांचे कडील पत्रानुसार तसेच प्रधानमंत्री, रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या पण रेती अभावी घरकुलाचे काम सुरू न झालेल्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबतची यादी गटविकास अधिकारी वरोरा यांच्या कडून तहसील कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार जप्त केलेली अंदाजे 70 ब्रास रेती 23 लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग 4 दिनांक 17-08-2015 नुसार शोभा ठाकरे, गंगूबाई पराते, सताबाई कुमरे, संतोष मडकाम, राकेश मडावी, शालिक मडावी, चंदू एडमे, मंगेश सिडाम, अभिमान चौधअरी, केशव चौधरी, प्रशांत नन्नावरे, गोदावरी चौधरी, दिनेश चौधरी, सुभाष चौधरी, पिंटू कुमरे, अनिल मेश्राम, प्रकाश उईके, चिंधुजी नन्नावरे, दौलत नन्नावरे, दिलीप तुमसरे, चंद्रभान येरकाडे, अतुम शेंडे या लाभार्थ्यांना  मोफत प्रत्येकी 3 ब्रास रेती तर सविता लिगाडे या लाभार्थ्याने थेट अर्ज सादर केल्यामुळे त्यांना 4 ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय घेतला असून 10 फेब्रुवारी ला सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रेती साठ्याचे विल्हेवाट लावली जाणार आहे.  यासाठी गौण खनिज वितरण,  वाहतुक पासेस व गस्त पथक असे 3 पथक तयार करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार योगेश कौटकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.