रस्त्याच्या मागणीसाठी पोद्दार स्कूल समोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन 

69

   एका महिन्यात अतिक्रमण काढण्याचे नायब तहसीलदारांचे लेखी आश्वासन   

ब्रम्हपुरी  : पोद्दार स्कूल च्या संस्थाचालकांनी तुमडी मेंढा येथील तलावाच्या जागेवर अतिक्रमण केले. तलावा लगत असलेल्या शेतकऱ्यांना जाणे येण्याचा पांदन रस्ताच पोद्दार स्कूलने  गिळंकृत केल्यामुळे तलावाच्या परिसरातील आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली. त्या विरोधात सबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.त्यामुळे संतापल्या शेतकऱ्याने पोद्दार स्कूल च्या विरोधात आक्रमक होऊन शाळेसमोर आपल्या मागण्याला न्याय मिळावे म्हणून  काळे झेंडे घेऊन धरणे व निदर्शने करण्यात आले.

.         सविस्तर वृत्त असे की, शहरापासून अवघ्या दोन तीन किलोमिटर अंतरावरील तुमडीमेंढा येथे मुख्य राज्य मार्गाच्या बाजूलाच मे. विजय किरण मॅनेजमेंट एज्युकेशन इन्स्टिट्युट नागपूर तफे डायरेक्टर किरण विजय वडेट्टीवार द्वारा संचालित स्टेम पोद्दार लर्न स्कूल  ची भव्य इमारत उभी आहे. या इमारतीचे निर्मिती करताना संस्था चालकांनी स्कूलला लागूनच असलेल्या  तलावाची मोकळी जागा असल्याने आपल्या राजकीय शक्तीचा आणि पैशाचा वापर करून तलावाच्या जागेवर अतिक्रमण केले. तसेच तलावा खाली असलेल्या माहेर, खरबी, तुमडीमेंढा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्याच जागेवर पांदण रस्ता होता त्याच रस्त्याने शेतकरी जाणे येणे करीत होते.मात्र संस्था चालकाने शासनाच्या मालकीच्या तलावाच्या जागेवर अतिक्रमन केले व शेतकऱ्यांचा पांदन रस्ता गिळंकृत केला. त्यामुळे माहेर, खरबी ,तुमडीमेंढा येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात व हंगामाच्या वेळेस शेतावर जाणे कठीण झाले.

.         सदर संस्था चालकाने केलेले अतिक्रमण हटवावे म्हणून गावकऱ्यांनी अनेकदा सबंधित प्रशासनास लेखी तक्रार केली.परंतु गावकऱ्यांच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली नाही.म्हणून माहेर, खरबी, तुमडीमेंढा येथील शेतकऱ्याने पोद्दार लर्न स्कूल च्या व्यवस्थापनाच्या विरोधात अतिक्रमण हटविण्याची मागणी करीत स्कूल समोरच धरणे व निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन विनोद झोडगे ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख भारतीय कम्युनिस्ट पार्टी व अविनाश राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अरुण वणकर राज्य सहसचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा नागपूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलन दरम्यान नायब तहसीलदार गोविंदवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन येत्या एक महिन्यात अतिक्रमण काढण्याचे  लेखी आश्वासन दिले.

.         धरणे व निदर्शने या आंदोलनासाठी गावातील गुलाब बागडे, गणेश बागडे,नारायण अमृतकर, वनकर, देवेंद्र अमृतकर, शालू बागडे, सुनंदा मेश्राम, राजश्री मेश्राम, मंदा मेश्राम, हिरामण महाजन, तसेच माहेर, खरबी, तुमडीमेंढा येथील शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.