समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत येऊ – आ. प्रतिभा धानोरकर

26

वरोरा : आज समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता समाजातील सर्व नागरीकांना सोबत येणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभा धानोरकर यांनी धनोजे कुणबी समाजाद्वारा आयोजित राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

.          वरोरा तालुका धनोजे कुणबी समाज द्वारा दि. 27 जानेवारी रोजी धनोजे कुणबी सभागृह वरोरा येथे राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. यावेळी आ. प्रतिभा धानोरकर यांनी मत व्यक्त करतांना सांगितले की आजच्या युगात प्रत्येक समाजाने आपला विकास साधने गरजेचे आहे. हा विकास साधण्यासाठी आपण देखील एकत्रीत येणे गरजेचे आहे. भविष्यात समाजाच्या विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वधु-वर परिचय मेळाव्यातून भविष्यातील योग्य जोडीदार निवडून सुखी संसाराचे स्वप्न पुर्ण करावे, असे मत देखील यावेळी व्यक्त केले. अलीकडच्या धावपळीच्या युगात मुला-मुलींचा शोध कठीण असून या मेळाव्याच्या निमित्ताने समाजाने एक संधी निर्माण केली असल्याचे आ. प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

.          यावेळी मंचावर विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे त्यासोबतच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी इतर मान्यवरांनी देखील आपले मत व्यक्त करत समाजाप्रती आपण देणं लागत असल्याची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी धनोजे कुणबी समाजातील अनेक पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.