पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर आक्रोश मोर्चा

38

विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

उन्हाळ्या आधीच पाण्यासाठी महिलांचा टाहो

नळ योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

 महिन्याभरापासून नळ धारक त्रस्त

चंद्रपुर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायतीचे गाव आहे. गावात कुटुंबांची संख्या 3 हजार पाचशे च्या आसपास असून गावात नळधारकांची संख्या १२00  च्यावर आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे मागील महिन्यापासून नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी नळधारक त्रस्त झाले. नळ योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी विसापुरातील नळधारकांनी ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा सोमवारी काढून रोष व्यक्त केला. मोर्च्यात शेकडोवर नळधारक सहभागी झाले होते, यावेळी मोर्चेकऱ्यांना सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम समोरे गेले. त्यांनी लवकरच नळ योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

.          विसापूर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम यांच्या नेतृत्वात नळधारकांचा मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीवर पाणी समस्या निकाली काढण्यासाठी मोर्चा निघावी व पिण्याचे पाणी देणार नसाल तर आम्हाला करात सुट द्या, अशी मागणी प्रदीप गेडाम यांनी लावून धरली. दरम्यान आक्रोश मोर्च्यातील नळधारकांनी आम्हाला नळ योजनेचे पाणी नियमित मिळाले पाहिजे. अशी आग्रही मागणी केली. यावेळी मोर्चेकऱ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य दिलदार जयकर व गजानन पाटणकर हे देखील होते.

.          विसापूर ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळ योजना आहे. या नळयोजनेत वर्धा नदीवरील पाण्याच्या टाकीवर बिघाड निर्माण झाला. हा बिघाड अद्याप दुरुस्त झाला नाही. परिणामी सोमवारी नागरिकांचा संयम तुटला. गावातील नळधारकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, या एकमेव मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर धडक देऊन आक्रोश प्रकट केला.

.          विशेष म्हणजे बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी तीन वर्षांपासून नाही. यामुळे गावाकऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे. प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण होत आहे. वर्धा नदीवरील पाण्याच्या टाकीवरील पंपसेट जुना झाला. त्यात नेहमी बिघाड होत असते. यावर उपाय योजना म्हणून नवीन पंपसेट विकत घेण्याचा ठराव करण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. यामुळे गावातील नळधारकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजघडीला हातपॅम्प व विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे गावात कृत्रिम पाणी समस्या निर्माण झाली आहे.

” आमची नळ योजना २0 वर्षांपूर्वीची आहे. वर्धा नदीवरील पंपसेट मध्ये अनेकदा बिघाड झाला. तो जुना झाला आहे. नवीन पंपसेट विकत घेण्याबाबत आम्ही ठराव केला. मात्र त्याची अंमलबजावणीच अद्याप झाली नाही. दरवर्षी वर्धा नदी पात्रात रेतीचा बंधारा बांधून उन्हाळ्यात पाणी पुरवठा करावा लागतो. त्याच प्रमाणे पाणी टाकीवरील फिल्टर मीडिया देखील जुना झाला आहे. यामुळे नळधारकांना नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. आता मात्र सर्वच कामे करून नळधारकांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने उपयोयोजना केली जाणार आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच, ग्रामपंचायत विसापूर.