अखेर प्रशासनाने बोडीच्या जागेवरील अतिक्रमण हटविले

33

वानेरी येथील लाभधारक शेतकऱ्यांना मिळाला न्याय

सिंदेवाही – तालुक्यातील मौजा वानेरी येथील काही नागरिकांनी शेतकऱ्यांच्या वापरात असलेल्या बोडीच्या पोटात अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले असल्याने शेतकऱ्यांना बोडीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. मात्र नुकतेच प्रशासनाने सदर बोडीतील नागरिकांचे अतिक्रमण काढून टाकल्याने अखेर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

.        मौजा वानेरी येथील शासकीय जागेवर असलेल्या भूमापन क्रमांक -११६ आराजी ०.७०हे.आर . बोडीच्या पोटातील जागेत गेल्या पाच सहा वर्षापासून गावातील सात ग्रामस्थांनी अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले. व शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळें या बोडीच्या पाण्याचे लाभधारक पाण्यापासून वंचित राहत होते. परिणामी या शेतकऱ्यांचे पीक हातातून जात होते. याबाबत बोडीच्या पाण्याचे लाभधारक विठ्ठल डोनुजी कामडी व इतर १२ शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून बोडितील अतिक्रमण काढून बोडीची जागा खुली करून देण्यात यावी. अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे प्रशासनाने सदर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत नुकतेच अनधिकृत बांधकाम हटवून शासनाने शासनाची जागा ताब्यात घेतली आहे.

.        सदर बोडीतिल अतिक्रमण काढून जागा मोकळी केली असल्याने आता त्या १२ शेतकऱ्यांना त्या बोडीचा लाभ मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वच विभागाच्या जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, आपापले कायदेशीर जबाबदारी पार पाडली व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून कायमचे मुक्त केले. या कारवाई साठी जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता गजानन भुसारी, तोगट्टीवार, म्हसेकर, नायब तहसीलदार मंगेश तुमराम, पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर महले, मंडळ अधिकारी तोडसाम वानेरीचे तलाठी, ग्रामसेवक वाघमारे, ग्रामपंचायतचे सरपंच व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.