क्रेडिट कार्ड च्या नावावर व्यापाऱ्याला १६ लाखाचा चुना

30

वरोरा पोलिसात तक्रार दाखल : ओटीपी सांगणे पडले महागात

वरोरा

.        आपले क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले ते बंद होणार त्यामुळे तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी सांगा मी बँकेतून बोलतोय असे सांगताच व्यापाऱ्याने ओटीपी सांगितला आणि बँक खात्यातून तब्बल १६ लाख ८१ हजार रुपयांचा चुना वरोरा शहरातील तृप्ती इलेक्ट्रिकल्सचे संचालक नरेश शंकर सहारे यांना लावल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबत सहारे यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली.

.        वरोरा येथील साई तृप्ती इलेक्ट्रॉनिक्स अँड तृप्ती इलेक्ट्रिकल्सचे संचालक नरेश शंकर सहारे यांचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वरोरा शाखेत खाते आहे. दि. १ जानेवारी रोजी एका व्यक्तीने बँक अधिकारी असल्याचे सांगून आपण बँकेतून बोलत आहे. आणि तुमचे क्रेडीट कार्ड ब्लॉक होणार आहे. ते होऊ नये म्हणून तुमच्या भ्रमणध्वनीर ओटीपी पाठविला असून तो सांगण्यास सांगितले. आणि ओटीपी सांगितल्यानंतर काही वेळातच सहारे यांच्या भ्रमणध्वनीवर वेगवेगळे संदेश यायला लागले. यावरून सहारे यांना संशय आल्याने त्यांनी लगेच बँकेत जाऊन खाते व डेबिट कार्ड बंद केले. एक आठवड्यानंतर त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी पुन्हा बँकेत जावून खाते सुरु केले. त्यानुसार ११ जानेवारी रोजी त्यांचे खाते सुरु करण्यात आले. परंतु बँक खाते सुरू होताच १२ जानेवारीला त्यांच्या खात्यातून १६ लाख ८१ हजार ९९९ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात वळते करण्यात आले.

.        यामुळे सहारे यांना धक्काच बसला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वरोरा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.