सामाजिक वंचितांना न्याय देण्याचे कार्य पत्रकारांकडून घडावं : आ. प्रतिभा धानोरकर

48

पत्रकार दिनी प्रथमच वृत्तपत्र वितरकाचा सत्कार

व्हाईस ऑफ मीडियाचा पत्रकार दिन थाटात संपन्न

वरोरा

.        राजकीय नेत्यांचे निर्णय व समाजाचे मत यांचे भान ठेवत पत्रकारांनी वस्तुनिष्ठ लिखाण करण्याची आज गरज आहे. पत्रकार हा समाजाचा पहारेकरी असतो. कुणाची बाजू घेण्यापेक्षा सत्य जाणून घेणे हेच वृत्तपत्र आणि पत्रकाराचे महत्त्वाचे कार्य आहे. पडद्यामागे घडणाऱ्या सत्य-असत्याला समाजासमोर आणून सामाजिक वंचितांना न्याय देण्याचं कार्य पत्रकाराकडून घडावं. लेखणी चालवत असताना इतरांवर जाणीवपूर्वक घाव होऊ नये याची दक्षता पत्रकारांनी घ्यावी आणि त्यातून लोकशाही सुदृढ व्हावी असे परखड मत वरोडा भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. निमित्य होते व्हाईस ऑफ मीडियाच्या वरोरा शाखेतर्फे आयोजित पत्रकार दिन सोहळ्याचे.

.       येथील हॉटेल रॉयल प्लाझा मध्ये ६ जानेवारी रोज शनिवारला पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला येथील पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, वैनगंगा व्हॅली फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मते, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष शुभम चिमूरकर, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख राजू डांगे, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सचिव रवी शिंदे हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

.       वरोर्‍यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांना त्यांच्या हक्काचे पत्रकार भवन नसल्याने खंत व्यक्त करत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रकारांच्या पत्रकार भवनासाठी 25 लाखाचा बांधकाम निधी आमदार फंडातून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करत केला. व्हाईस ऑफ मीडियाचे देश पातळीवर चांगले काम सुरू असून पत्रकारांच्या चांगल्या व सकारात्मक कामात स्थानिक आमदार म्हणून आपला नेहमी हातभार लागेल असे आश्वासन देत पत्रकार नेहमी राजकारण्यांना जिवंत ठेवण्याचे कार्य करतात असे विचार व्यक्त केले.

.       वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र हे चंद्रपूर नागपूर या राज्य मार्गाला मार्गाला जोडून आहे. त्यामुळे या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण होत असून या भागात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कोळशाच्या खाणी यामुळे या भागातील प्रदूषणात वाढ झालेली आहे.तसेच जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापायी शेतकरी पिकांवर फवारत असलेल्या कीटकनाशकांमुळे देखील भाजीपाला व अन्नधान्य विषयुक्त बनले आहे. या समस्या गंभीर असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहेत.विषयुक्त अन्नधान्य व प्रदूषणामुळे कॅन्सरचा आजार मोठ्या प्रमाणे बळकात आहे. तसेच खाणीत कोळश्यासाठी खोलवर होणाऱ्या उत्खननामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खोल जात आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या या गंभीर समस्यांबाबत पत्रकारांनी लिखाण करून यावर उपाय शोधण्यासाठी राजकारण्यांना बाध्य करावे असे मत वैनगंगा फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यावेळी यांनी यावेळी व्यक्त केले.

.       पत्रकारांनी निपक्ष पत्रकारिता करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी पत्रकार आणि राजकारणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मत व्यक्त केले. मंगेश खाटीक यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या कार्याची दिशा व उपक्रम याबाबत यावेळी माहिती दिली.

.       पत्रकारितेच्या वाटेवर तब्बल 45 वर्षे समर्थपणे वाटचाल करणाऱ्या, तसेच वस्तुनिष्ठ पत्रकारितेची कास धरणारे तरूण भारताचे तालुका प्रतिनिधी श्याम आनंद ठेंगडी यांचा तसेच ३३ वर्षापासून अजूनही सायकलने वृतपत्र वाटपाचे अविरत काम करणारे संजय पोटे यांचा या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठातून एम एस सी परीक्षेत प्रथम आलेल्या खांबाडा येथील अविनाश बंग या पत्रकारांच्या पूनम या मुलीलाही शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

.        यावेळी व्हाईस ऑफ मेडिया कडून पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष चेतन लुथडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिव रवी खाडे यांनी तर अनिल नौकरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक व पत्रकार सहकुटुंब उपस्थित होते.