वासेरा तंटामुक्त समितीने केले चार प्रकरणाचे निपटारे

51

           समितीच्या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्षाचे स्वागत           

सिंदेवाही 

.           गावात निर्माण झालेले तंटे गावातच मिटविण्यात यावे. त्यासाठीच २००७ साली शासनाने गावागावात महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निर्मिती करून या समितीवर जबाबदारी दिली . दरम्यान मंगळवारी ग्राम पंचायत कार्यालय वासेरा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक आयोजित करून गावातील चार प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

.           गावातील लोकांना भांडणापासून पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. त्यानुसार मागील १६ वर्षापासून सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती कार्यरत असून दरवर्षी या समितीची पुनर्रचना करण्यात येते. यावर्षी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून राजू नंदनवार यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाली असून त्यांचे कार्यकाळातील यावर्षीची समितीची पहिली बैठक नुकतीच ग्राम पंचायत कार्यालय येथे महत्वाच्या विषयावर पार पडली. यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून राजु नंदनवार आणि सदस्य महेंद्र कोवले यांना पुष्पगुच्छ देऊन समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करून विषयाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये रामदास लोखंडे यांनी सदाशिव बोरकर यांचे विरोधात अर्ज सादर केला होता. तर सुधीर कुळमेथे यांनी ताराकांत बोरकर यांचे विरोधात, किशोर प्रभाकर बोरकर यांनी सचिन भोजराज बोरकर, व हुमेश धनराज बोरकर यांचे विरोधात, निळकंठ कोवले यांनी तत्कालीन रोजगार सेवक जीवन बावणे, यांचे विरोधात न्यायासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार प्रत्येक अर्जावर योग्य चर्चा करून सर्वांच्या अर्जांचा योग्य निपटारा केला.

.            वासेरा तंटामुक्त समितीच्या वतीने वर्षातून अनेकदा बैठका घेऊन समितीकडे आलेल्या अर्जावर चर्चा करून निपटारा करण्याचे काम करीत आहेत. आज पर्यंत या समिती मार्फत शेकडो जातीय, आंतरजातीय प्रेमविवाह लावून देण्यात आले आहे. तसेच अनेक वर्षापासून गुंतागुंतीचे असणारे प्रकरण समितीच्या माध्यमातून सोडविण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीला समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार, सरपंच तथा समिती सदस्य महेश बोरकर, पोलीस पाटील तथा निमंत्रक देवेंद्र तलांडे, पत्रकार प्रतिनिधी सुनील घाटे, महेंद्र कोवले, गिरीश धात्रक, रवींद्र बोरकर, दिनकर बोरकर, संजय कापकर, श्रीधर बोरकर, इत्यादी सदस्य उपस्थित होते.