नंदोरी ग्रामपंचायत वर शिवसेना उबाठाचे वर्चस्व

35

      मंगेश भोयर यांची सरपंच पदी निवड     

रवी खाडे
चंद्रपूर

.           भद्रावती तालुक्यातील राजकीय दुष्टिने महत्वाची मानली जाणारी नंदोरी ग्रामपंचायतची निवडणूक २०२१ मध्ये झाली होती. ९ सदस्य संख्या असलेल्या नंदोरी ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही गटाकडे बहुमत नसल्याने वेगवेगळ्या पॅनलची चौकूडा परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप २, बंडखोर भाजप चे २, इतर २ आणि काँग्रेस चे ३ असे उमेदवार निवडून आल्याने बंडखोर भाजप आणि काँग्रेस चे ३ असे समविचारी पार्टीचे गट एकत्र येऊन अडीच वर्षांचा सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या कार्य काळासाठी बुधवारी दि. २९ रोजी झालेल्या निवडणुकीत मंगेश उर्फ श्रीहरी भोयर यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.

.           नंदोरी ग्रामपंचायत मध्ये एकुण ९ सदस्य असून, सुरवातीला अडीच वर्षाचे सरपंच पद काँग्रेस चे शरद खामनकर यांना देण्यात आले. त्यानंतर भाजप चे बंडखोर मंगेश भोयर यांनी शिवसेना उबाठा चे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे बंधन बांधले. त्यानंतर बुधवारी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगेश भोयर यांना काँग्रेस ने हात देत सरपंच पदी विराजमान केले. मात्र वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे खरे समर्थक असलेले भानुदास ढवस यांनी आमदार धानोरकर यांचे न ऐकता थेट शिवसेना उबाठा चे मंगेश भोयर यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात व आमदार धानोरकर यांच्यत भानुदास ढवस यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली जात असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार शंकर भांदककर यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय टोंगे, तलाठी रवींद्र लोंढे उपस्थित होते.

.           काँग्रेस समर्पित भानुदास ढवस गटाने भाजपचे बंडखोर मंगेश भोयर यांच्या गटासोबत समेट घडवून अडीच अडीच वर्ष सरपंचपदा चा कार्यकाळ पूर्ण करण्याचे ठरल्याप्रमाणे शरद खामनकर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने ठरल्याप्रमाणे बुधवारी सरपंच पदाची निवडणूक झाली. यात मंगेश भोयर यांची सरपंच पदी निवड झाली. नंदोरी येथील भाजपचे दिग्गज नेते नरेंद्र जिवतोडे यांच्या कडे दोन उमेदवार होते. आता अडीच वर्षानंतर जिवतोडे काहीतरी हालचाल करणार असे गावाकऱ्यांना वाटत होते मात्र यावेळी सुद्धा त्यांचा कोणताच इलाज चालला नाही. मात्र शिवसेना उबाठा गटाचे भोयर यांनी त्यांना मात देऊन काँग्रेस सोबतच हात मिळवून सत्तेत बसले. तर दुसरीकडे आमदार धानोरकर यांनी भानुदास ढवस यांना शिवसेना सोबत सत्ता स्थापन करायची नाही अशी तंबी दिली होती मात्र त्यांच्या ही आदेशाला न जुमानता ढवस यांनी शिवसेनेचे मंगेश भोयर यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ टाकल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.