बिबी येथे होणार पंचायत वन उद्यानाची निर्मिती

38
  • स्वातंत्र्यदिनी झाला प्रारंभ

गडचांदूर – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे पंचायत वन उद्यानाच्या कामाला स्वातंत्र्य दिनापासून सुरुवात झाली असून गावकऱ्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत बिबीच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. सदर वृक्ष लागवड सात वर्ष वनविभागाच्या नियंत्रणात असणार असून संपूर्ण वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागाची राहणार आहे. १८ महिने वयाच्या झाडांची लागवड करण्यात आली असून परिसर हिरवेगार होणार आहे.

वृक्ष मोठे झाल्याबरोबर याठिकाणी नागरिकांसाठी सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी ट्रॅक बनणार असून ग्रीन जिम लावण्यात येणार आहेत. युवकांना खेळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण चंद्रपूर एस. डी. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण राजुरा य. वी. गेडाम यांच्या मार्गदर्शनात वनपाल वी.एच. चव्हाण पंचायत वन उद्यानावर नियंत्रण ठेवणार आहे.

पंचायत वन उद्यानामध्ये बेल, देशी आंबा, पिंपळ, वड, उंबर, कडुलिंब या प्रजातीची १०० झाडे लावण्यात आली असून करवंद आणि मेळक्याची अतिरिक्त झाडे सुद्धा लावण्यात येणार आहे. पंचायत वन उद्यानाचे उद्घाटन सरपंच माधुरी टेकाम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत सदस्य राजू नन्नावरे, सुरज कुळमेथे, भारती पिंपळकर, सोनाली आत्राम, प्रणाली कोरांगे, दुर्गा पेंदोर, लीलाबाई चंद्रगिरी, नांदा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोरकर, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोरकर, मुख्याध्यापक अनंत रासेकर, पत्रकार गौतम धोटे, आनंद पावडे, श्रावण चौके, उत्तम काळे, शेख रशीद, सुधाकर मिलमिले, दादाजी भेसुरकर, शेख पापा, विनोद राठोड, मुकुंदा गुलबे, कमलाकर देरकर, गणपत टेकाम, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक स्वास्थ जपण्यास मदत होणार

ही योजना गावाच्या विकासात भर पाडणारी असून यामुळे सामाजिक स्वास्थ जपण्यास मदत होणार आहे. स्मार्ट व्हिलेज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, आदर्श ग्राम, सुंदर ग्राम अशा स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींची या योजनेकरिता निवड करायची होती. कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेची आपण मागणी केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने त्वरित हिरवी झेंडी देऊन बिबी गावाची निवड केली. त्याबद्दल आम्ही समस्त गावकऱ्यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाचे आभार मानतो.

– आशिष देरकर

उपसरपंच, ग्रामपंचायत बिबी