पळसगाव- कुचना रस्त्याची दुरावस्था दूर करा

56
  •  किशोर टोंगे यांची मागणी

भद्रावती

तालुक्यातील कुचना या गावाजवळ वणी-वरोरा रस्त्यापासून जवळच असलेल्या पळसगाव या गावाला रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत असून यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते किशोर टोंगे यांनी पळसगाव या गावाला भेट दिली असता नागरिकांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. स्थानिक प्रशासन ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत गंभीर नसून गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याबाबत आपण वरिष्ठ शासन स्तरावर पाठपुरावा करून या रस्त्याचा व पुराचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले असून ग्रामीण भागातील रोजगार आणि इतरही समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

यावेळी वर्धा नदीच्या खोऱ्यातील या गावाला जवळच असलेल्या नाल्यात कोळसा खाण व इतर कामांचा गाळ आणि राडारोडा पडलेला असल्याने पात्र अरुंद होत गेले आहे त्यामुळे सातत्याने गावाला पुराचा सामना करावा लागतो हा प्रश्न शासनाने तातडीने पावसाळ्यानंतर नाला खोलीकरण करून सोडवावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत संदीप झाडे, प्रकाश निब्रड, उपसरपंच स्वप्नील वासेकर,गणेश जोगी, महेश निब्रड, प्रेम महातळे, प्रशिक वानखेडे, अतुल हेकाड इत्यादी उपस्थित होते.